लाभार्थ्यांना धनादेश वितरित,महात्मा फुले जयंती साजरी व योजनांची दिली माहिती
धाराशिव दि.११ अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व इतर वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह" साजरा केला जातो.यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
त्याअंतर्गत,११ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते भैरवनाथ कानडे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात समाज कल्याण विभागामार्फत सैनिक शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले.तसेच "कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना" अंतर्गत लाभार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी वर्गासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज चव्हाण युवराज यांनी केले.या वेळी विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजकल्याण निरीक्षक श्री.के.बी. थोरात तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
