मुंबईच्या गेम्स फौंडेशनचा पुढाकार
धाराशिव, दि. 18 -
ग्रामीण भागातील गरजू, होतकरू विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी मदत व्हावी, गरीबांच्या मुली शिक्षणाच्या प्रवाहात याव्यात, यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील 24-7 फौंडेशनच्यावतीने धाराशिव जिल्ह्यातील 200 विद्यार्थिनींना प्राथमिक स्वरूपात सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास फौंडेशनच्या उपाध्यक्ष स्नेहा संगवी, प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी, तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजीनाथ घोडके, तुळजापूरचे गटशिक्षणाधिकारी अर्जून जाधव, उमरग्याचे गटशिक्षणाधिकारी युवराज पडवळ, वाशीचे घोलप, धाराशिवचे हसराल यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गरजू व होतकरू मुलींना प्राथमिक स्वरूपात सायकल वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, लोहारा, उमरगा, परंडा या सहा तालुक्यांसाठी प्रत्येकी 28 सायकली तर भूम तालुक्यातील होतकरू मुलींसाठी 24 व वाशीसाठी आठ, याप्रमाणे दोनशे सायकलींचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फौंडेशनच्यावतीने ज्या-त्या तालुक्यांना सायकली वाटपासाठी पाठवून देण्यात आल्या आहेत. दरम्यान ग्रामीण भागातील गरजू मुलींना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी सायकल मिळाल्याने मुलींमध्ये आनंदाचे वातावरण तर पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुळजापूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले
