कळंब (जि. उस्मानाबाद) ; कळंब येथे आज (सोमवार) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. वरून धो धो पाऊस कोसळत होता तरी देखील आगदी शिस्तीत होते सर्व मराठा बंधू भगिनी .ओबीसी कोट्यातून न्याय्य आरक्षण द्यावे या मागणीसाठी साधारण एक लाख मराठा बांधव, भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाले. कोरोना कालखंडानंतर मराठा समाजाला ओबीसी मधूनच संविधानिक आरक्षण द्यावे, ही ठोस मागणी घेऊन उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब शहरात सोमवारी लाखो मराठा समाज बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या मार्फत मुलींनी व महिलांनी खालील मागण्याचे निवेदन दिले.
1. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा विभाग हा निजाम राजवटीमध्ये म्हणजेच हैद्राबाद स्टेटमध्ये समाविष्ठ असलेला भाग होता. व मराठवाडयातील शेती करणाऱ्या कुणबी समाजाला मराठा असे संबोधले गेले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा होवून मराठवाडा विभाग हा 1 वर्षे 1 महिना व 2 दिवसांनी भारतातील एकसंघ महाराष्ट्रामध्ये त्याचा समावेश झाला. वास्तविक मराठा, कुणबी व कुणबी मराठा हे वेगळे नसून एकच आहेत, हे अनेक वेळा सिध्द झालेले आहे. मराठा समाज मुलत: आर्थिक दृष्टया व शैक्षणिक दृष्टया मागास असून राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगवेगळे आयोग स्थापन केलेले होते. त्या प्रत्येक आयोगाने त्यांचा अहवाल सादर केलेला आहे.
ज्यामध्ये राणे समिती, गायकवाड आयोगाने सादर केलेल्या अहवालात विदर्भ व खानदेशातील कुणबी, कुणबी मराठा व मराठा हे वेगवेगळे नसून एकच असल्याचे निरिक्षणे नोंदविलेले आहेत. त्याबाबत समाजामध्ये जातीव्यवस्था असून देखील पूर्वीपासून कुणबी,कुणबी-मराठा, लेवा पाटील व मराठा ही एकच जात असल्याने रोटी-बेटीचा व्यवहार पंरपरेने होत आलेला आहे, ही बाब देखील उपरोक्त नमुद केलेल्या सर्व अहवालामध्ये नमुद आहे. तसेच पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील आणि आज रोजी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यामध्ये असणारा मराठा समाज इतर मागास म्हणून आरक्षणाचा लाभ घेत आहे. केवळ महाराष्ट्र राज्यात सामाविष्ट असणाऱ्या मराठवाडयातील मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे मराठवाडयातील मराठा समाजाचा समावेश ओबीसी सुचीमध्ये करणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारने तातडीने उचित कार्यवाही करावी.
2. मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा तरूणांच्या उदयोग वाढीसाठी स्थापन झालेले असून, त्याची कर्ज मर्यादा व्याज परताव्यासाठी ५० लक्ष पर्यत करण्यात यावी.
3. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहास प्रत्येक जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी मंजुरी देऊन निधीची तरतुद करावी व वार्षिक उत्पन्न् ८ लक्ष पेक्षा कमी असणाऱ्या सर्व मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करावी.
४ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत निकाली निघत नाही ,तोपर्यंत कोणती ही नोकर भरती करु नये तसेच कोणत्याही निवडणुका पण घेऊ नयेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या मोर्चा साठी काही मंडळी रात्री पासूनच तर बाकी सकाळी गावागावातून मराठा समाजाचे पुरूष, महिला, विद्यार्थी, वयोवृद्ध, वकील, शिक्षक, व्यापारी दाखल होत होते.
कळंब तालुका व लातूर, बीड, औरंगाबाद, नांदेड, जालना, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, तुळजापुर उस्मानाबाद, वाशी, लोहारा, नळदुर्ग, आदी भागातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
मराठा आरक्षण मोर्चाच्या वेळी अन्य समाज बांधवांच्या वतीने पाण्याचे जार, तसेच बिस्कीट पुडे, केळी, व्यापारी बांधवांच्या वतीने केळी, चहा, गायत्री अॅक्वा व राजेंद्र बिक्कड मित्र परिवाराच्या वतीने पाण्याचे जार, नुरानी अॅक्वाच्या वतीने पाणी, गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने पाणी, जैन युवक मंडळाच्या वतीने चहाची सोय करण्यात आली होती.
या मोर्चात लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक नवनीत कावत, कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश, कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला. १० पोलीस निरीक्षक, ३७ पीएसआय, व एपीआय, ५५५ पोलीस, दोन दंगल नियंत्रण पथक यावेळी अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती.