उस्मानाबाद,दि.30: उस्मानाबाद जिल्हयामध्ये विशेष अतिसार नियत्रंण पंधरवडा कार्यक्रम 1 जुलै ते 15 जुलै 2022 या कालावधित राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान व सस्टेनेबल डेव्हलपमेन्टल गोल्स् यांचे एक उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण असून 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालकांचे मृत्यूचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम जिल्हयात दि. 1 ते 15 जुलै 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सदर कालावधीमध्ये 1246 आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांच्या घरी भेट देवून ओ. आर. एस. पॉकिट व ज्या बालकांना अतिसार असेल अशा बालकांना झिंक गोळयाचे वाटप करण्यात येवून त्याठिकाणी स्वच्छता राखणे स्वच्छ हात धुणे याचे प्रात्यक्षिकही आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातुन करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शालेय विध्यार्थी, अंगणवाडी लाभार्थ्याकरीता शाळा व अंगणवाडयामधून जेवणापूर्वी व शौचानंतर साबण पाण्याने स्वच्छ हात धुण्याच्या पध्दती व महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा पंधरवडा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभागांना देण्यात आल्या. सदर मोहिमेकरीता वैदयकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकां यांना प्रशिक्षण देण्यात आले असून ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
