मुंबई: गेल्या १० दिवसांच्या सत्ता नाट्याचा अंक आता संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे (Uddhav Thackeray Resigns). शिवसेनेतील नेत्यांची बंडखोरी आणि १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आज अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आहे. शिंदे गटाने ३९ आमदारांसह बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारने बहुमत सिद्ध करावे असं सांगितलं. त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या बाजूने न लागल्याने उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची नामुष्की आली.
ठाकरे सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. एक अखेरचा प्रयत्न म्हणून उद्धव ठाकरेंनी काल बंडखोर शिवसेना नेत्यांना भावनिक सादही घातली. मात्र, बंडखोर शिंदे गट त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यानंतर भाजपने खेळी केली. देवेंद्र फडणवीसांनी २८ जूनच्या रात्री राज्यपालांना पत्र देत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याने त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या विशेष अधिवेशन घेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.
राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर ठाकरे सरकारला काहीही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
.jpg)