जिल्हा नियोजन समितीचा आढावा
धाराशिव, दि.26 : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमधून विविध यंत्रणांना निधी उपलब्ध करून देण्यात येतो.निधी खर्च करण्यासाठी केवळ 60 दिवस आता शिल्लक आहेत.तेव्हा यंत्रणांनी गुणवत्तापूर्ण कामे करून निधीचा योग्यप्रकारे विनियोग करून तो 60 दिवसात खर्च करावा,असे निर्देश पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिले.
आज 26 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंत्रणांना निर्देश देतांना श्री.सरनाईक बोलत होते.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री विक्रम काळे,राणाजगजितसिंह पाटील,कैलास पाटील,प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,पोलीस अधीक्षक संजय जाधव, समितीचे विशेष निमंत्रित सदस्य महेंद्र धुरगुडे,नवनाथ जगताप व महेश नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री सरनाईक म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप वेळेत झाले पाहिजे, त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी मदत होईल. प्रत्येक शाळेत शौचालय असणे गरजेचे आहे.ही कामे तातडीने सुरु करावीत.जिल्ह्यातील ज्या अंगणवाड्या शाळेच्या आवारात नाही.त्या अंगणवाड्याचे बांधकाम शाळेच्या आवारात सुरु करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.क्रीडा विभागाच्या योजनेत क्रीडा साहित्य देताना कुस्तीसाठी मॅटचा समावेश त्यामध्ये करावा त्यामुळे जिल्ह्यात कुस्तीला प्रोत्साहन देण्यास मदत होईल,असे ते यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील विविध विभागांतील प्रलंबित कामांचा आढावा घेताना श्री. सरनाईक यांनी आरोग्य,शिक्षण,रस्ते, वीजपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांशी संबंधित योजनांवर विशेष भर दिला. "निधी मंजूर असतानाही तो वेळेत वापरला जात नसल्याने विकासकामे रखडली आहेत.त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो," असे सांगून पालकमंत्री श्री. सरनाईक यांनी यावेळी अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा नियोजन समितीने सन 2024-25 या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत 408 कोटींचा विकास निधी मंजूर केला आहे.143 कोटी रुपयांच्य कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून 105 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी 91 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.जिल्हा वार्षिक योजनेसाठी सन 2025-26 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण योजनांसाठी 358 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. पुढील मान्यतेसाठी हा प्रारुप आराखडा राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे.या निधीच्या माध्यमातून नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
सरनाईक यांनी विविध विभागांतील कामांचा आढावा घेताना प्रत्येक प्रकल्पाच्या प्रगतीची तपशीलवार माहिती घेतली.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. निधीच्या योग्य वापरासाठी आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कठोर पावले उचलावीत,असे सरनाईक यांनी सांगितले.
खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, खरीप-रब्बी पिक कर्ज वाटप शेतकऱ्यांना वेळेवर करावे.पिक कर्ज वाटपात बँकांनी अडवणूक करु नये. आ.श्री काळे यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज वितरण कंपनीने तातडीने पावले उचालवीत असे ते म्हणाले.श्री.राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केलेल्या पिककर्जाची माहिती उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.यावेळी विविध बँकांना शेतकऱ्यांच्या होल्ड केलेल्या बँक खात्याचे होल्ड काढून घ्यावे, अशी मागणी आ.श्री.कैलास पाटील यांनी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.ओंबासे म्हणाले की,ज्या बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करण्यात कुचराई करतात अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल.
बैठकीत जिल्ह्यातील जलसंधारण प्रकल्प,शाळांच्या इमारतींचे बांधकाम,रस्ते दुरुस्ती,ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. "प्रत्येक विभागाने आपला अहवाल ३० दिवसांत सादर करावा आणि निधीचा खर्च वेळेवर करण्यासाठी अंमलबजावणी सुरू करावी," असे निर्देश श्री. सरनाईक यांनी दिले.
विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे यांनी केले.यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
२६ जानेवारी, २०२५
Home
Unlabelled
येत्या 60 दिवसात विकासकामांचा निधी खर्च करा - पालकमंत्री प्रताप सरनाईक
येत्या 60 दिवसात विकासकामांचा निधी खर्च करा - पालकमंत्री प्रताप सरनाईक
About Kalayog
कलायोग हे वृत्तपत्र कला, साहित्य,आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक घडामोडींचा वेध घेऊन वाचकांना वास्तविकतेचे निष्पक्ष दर्शन घडवते.मुख्य संपादक - शरद बलभीम आडसुळ Call - 9689895852.
