कळंब: तालुक्यातील जि. प. प्रशाला इटकूर येथे धाराशिवचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. अशोक पाटील यांनी भेट दिली.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर यांनी प्रशलेच्यावतीने यथोचित सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेत इयत्ता पाचवी वर्गास भेट दिली असता नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल इत्यादी स्पर्धा परीक्षांची चालू असलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून कौतुक केले. प्रशालेतील कार्यरत असलेले सुसज्ज वाचनालय पाहून मुलांची वाचनाची आवड पाहून आश्चर्य व्यक्त केले. तसेच सध्या चालू असलेल्या आकारिक मूल्यमापन चाचणीचे निरीक्षण करून प्रशालेतील परीक्षेचे निकोप वातावरण, पटसंख्या या बाबतीत मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले. तसेच इंग्रजी संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशा सूचनाही सर्वांना त्यांनी दिल्या. तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून बसवण्यात आलेल्या सीसीटीवी यंत्रणेचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार बालाजी आडसूळ, शिक्षक सूर्यकांत गंभीरे, दिनेश आडसूळ तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
