बोरगाव ध. च्या प्रभंजय सांगळे ( पाटील ) ची पोलीस उपनिरीक्षकपदी वर्णी
बालाजी देसाई-
ईटकूर : जिद्द, चिकाटी व मेहनत यांची सांगड घातल्यास यश निश्चित मिळते याचे ज्वलंत उदाहरण बोरगाव ध. येथील प्रभंजय प्रभाकर सांगळे ( पाटील ) यांनी करून दाखवत त्यांनी अथक परिश्रमातून पोलीस निरीक्षक पदाला गवसणी घातली असून तरुणां समोर एक आदर्श निर्माण केला आहे. तर मुलगा
" फौजदार " झाल्याचा आनंद आई- वडील यांच्या चेह- यावर दिसून आला.
कळंब तालुक्यातील बोरगाव धनेश्वरी हे दोन- अडीच हजार लोकसंख्येचे गाव याच गावातील शेतकरी प्रभाकर शाहूराव सांगळे ( पाटील ) व आई जयमाला प्रभाकर सांगळे यांची घरची परिस्थिती बेताचीच त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. मोठा मुलगा श्रीनिवास हा मूकबधिर असुन तो आज प्रगतशील शेती करत आहे. तर लहान मुलगा प्रभंजय सांगळे याने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण मामाच्या गावी म्हणजे बार्शी तालुक्यातील उंबरगे येथील सरस्वती कराड विद्यालयात तर उच्च माध्यमिक शिक्षण कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात घेत पदवी प्रदान केली. पदवी नंतर आपणास "क्लास वन अधिकारी" बनायचे असे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास सुरू केला.
आई- वडीलांच्या काबाडकष्टातून मिळणा-या उत्पन्नातून घर व शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आई-वडिलांची होणारी घालमेल " प्रभंजय " ला बघवत नव्हती. आई- वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेऊन परिस्थिती बदलवण्याचा निश्चय करत कठोर परिश्रम करुन लोकसेवा व राज्यसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा ची तयारी सुरू केली तसेच शेती करत करत शेतातील झाडा खाली बसुन अभ्यास करत उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, मंत्रालयीन सहाय्यक पदापर्यंत अंतीम स्थान मिळवण्यासाठी चार वेळेस मजल मारली तर पि. एस. आय साठी दोन वेळेस मुलाखत देऊन सुध्दा अपयश आले होते. या अपयशाला न डगमगता
" प्रभंजय " ने नव्या उमेद्दीने आपणास "क्लास वन अधिकारी" बनण्याचे असे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करण्यासाठी विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणारे पुणे गाठले. सन 2022 ला कंबाईन गट ( ब ) साठी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी फॉर्म भरला. कुठलाच क्लास न करता अफाट परिश्रम व अभ्यासात सातत्य ठेवून परिक्षा दिली. त्याच परिक्षेचा निकाल दि. 1 आगस्ट 2024 रोजी लागला असुन त्यांने तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
प्रभाकर सांगळे यांच्या हरहुन्नरी लेकाने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.त्याच्या या यशामुळे आई
वडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे ते मोठ्या भावनेने सांगत आहेत. तर प्रंभजयला चुलते रमेश सांगळे यांचे वेळोवेळी सहाय्य व मार्गदर्शन मिळाले.तसेच गावातील शेतक-याचा मुलगा फौजदार बनल्याचा आनंद गावकरी व्यक्त करत कौतुक करत आहेत.
