चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार नवीन फौजदारी कायद्यांची माहिती - kalayog

२२ जुलै, २०२४

चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार नवीन फौजदारी कायद्यांची माहिती

 

 

केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि पोलीस अधिक्षक धाराशिव यांचा विशेष उपक्रम

 

धाराशिव. १ जुलै २०२४ पासून नवे भारतीय फौजदारी कायद्याचे एक नवे व सुधारित पर्व सुरु झाले आहे.यामध्ये भारतीय न्याय संहिता,२०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,२०२३,भारतीय साक्ष्य अधिनियम,२०२३ या कायद्यांचा समावेश आहे.या कायद्यांच्या तपशिलाविषयी जनसामान्य नागरिक, पोलीस विभाग,वकील आणि विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने केंद्रीय संचार ब्युरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार,सोलापूर आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जुलै २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता नवीन पोलीस अधिक्षक कार्यालय,धाराशिव येथे दोन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

या प्रदर्शनाचे उदघाटन पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी आणि क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड प्रल्हाद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हे प्रदर्शन नव्या भारताचे नवीन कायदे या विषयावर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी,भारतीय न्याय संहिता,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता,भारतीय साक्ष अधिनियम, नव्या कायद्यात अंतर्भूत केलेले नवीन कलमे व त्यांची कार्यपद्धती,ई-एफ आय आर,योग्य वेळेत न्याय, तंत्रज्ञानाचा वापर,न्यायवैद्यक शास्त्राला प्रोत्साहन,साक्षीदारांचे संरक्षण,लहान मुले व महिला सुरक्षा, मॉब लिन्चींग,संघटीत गुन्हे, दहशतवाद आणि देशविरोधी, पोलिसांच्या जबाबदारीमध्ये वाढ, न्यायाधीशाशी संबधित तरतुदी, अभियोजन संचालनालय,शैक्षणिक संस्थामध्ये शिकवले जाणार नवीन कायदे,काही महत्वाच्या गुन्ह्यांसाठी नवीन कायद्यामधील शिक्षेत वाढ आणि नवीन कायद्याविषयीचे गैरसमज आणि वस्तुस्थिती आदी विषयावरील माहिती मांडण्यात येणार आहे.प्रदर्शनामध्ये क्यू आर कोड स्कॅन लावण्यात येणार आहे.यामध्ये नवीन कायद्याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळणार आहे.

 हे प्रदर्शन सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.जास्तीत जास्त विद्यार्थी,विधी अभ्यासक,पोलीस,वकील आणि नागरीकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे.