मिलिंद गुणाजी म्हणाले, मविप्र संस्थेतर्फे असा अभिनव व विश्वविक्रमी उपक्रम राबविला गेला अन् त्याचा मी साक्षीदार झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे. ग्रंथ रांगोळीची भव्यता, लहान मुलांनी साकारलेले किल्ले, शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन पाहून मी भारावून गेलो आहे, असे उपक्रम कायम राबविले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्वरूप सर्वांना दाखवता यावे व त्यातून एक विचारधन प्रत्येकापर्यंत पोचावे यासाठी हा उपक्रम संस्थेतर्फे साकारण्यात आला. ग्रंथ रांगोळीत श्रीकांत देशमुख लिखित कुळवाडीभूषण शिवराय ग्रंथाच्या ७५ हजार प्रती वापरण्यात आल्या आहेत. या उपक्रमानंतर या प्रतींचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले जाणार असून, पुस्तकावर आधारित एक परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे छत्रपती शिवराय शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी आपल्या भाषणात केली. शिष्यवृत्तीची रक्कम दहा हजार रुपये असेल, असे त्यांनी नमूद केले.त्रिपुरी पौर्णिमेला दिवे लावले जातात, मात्र संस्थेच्या माध्यमातून ही खरी त्रिपुरी पौर्णिमा साजरी झाली. ज्यात ७५ हजार ज्ञानदीप प्रज्वलित झाले, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी केले.डॉ. भास्कर ढोके यांनी प्रास्ताविक केले. विश्वासराव मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. डॉ. तुषार पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या वेळी संस्थेचे पदाधिकारी यांसह वसंत गिते, शिवाजी चुंभळे, समीर वाघ, तसेच संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती
नाशिक : शिवरायांचा आठवावा प्रताप अन् आठवावी त्यांची भव्यता... या उत्कीला साजेसा उपक्रम नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेने साकारला आहे. कर्मवीर अॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची १७ हजार चौरस फुटांची ग्रंथ रांगोळी साकारली आहे. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (ता. २७) पार पडला. अभिनेते मिलिंद गुणाजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे प्रमुख पाहुणे, तर एमकेसीएलचे मुख्य सल्लागार विवेक सावंत अध्यक्षस्थानी होते. या वेळी छत्रपती शिवराय शिष्यवृत्तीची घोषणा व श्रीकांत देशमुख लिखित कुळवाडीभूषण शिवराय या ग्रंथाच्या पाचव्या जनआवृत्तीचे लोकार्पण करण्यात आले.