सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घ्यावा - kalayog

१२ ऑगस्ट, २०२०

सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घ्यावा

 

उस्मानाबाद, दि. 12 (जिमाका) :- देशातील मत्स्योत्पादनामध्ये भरीव वाढ व्हावी आणि देशातील मच्छिमारांच्या हितसंवर्धनासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ( Pradhan Mantri Matsya Sampada Yojana-PMMSY) अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना उस्मानाबाद जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली दि. 03 ऑगस्ट-2020 रोजी संपन्न झाली.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गंत मत्स्यव्यवसायाचा जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी योजनेस व्यापक प्रसिध्दी देण्याची सूचना केली आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रमुख उदिदष्टे खालीलप्रमाणे आहेत.

केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पूरक व अग्रक्रमित व्यवसाय करण्याचे  उदि्दष्ट ठरविण्यात आले आहे व याव्दारे भुजलाशयीन क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे, मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शाश्वत आर्थिक  उत्पन्नाचे स्त्रोत व  रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे. कृषि क्षेत्राच्या सकल मूल्यात वाढ करणे व  ‍निर्यातीत योगदान वाढविणे.

            प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा कालावधी  2020-2021 ते 2024-2025 असा आहे. या कालावधीसाठी केंद्र शासनाने 20 हजार 50 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये केंद्राचा हिस्सा 9407 कोटी रुपये, राज्याचा हिस्सा 4880 कोटी रुपये आणि लाभार्थी हिस्सा 5763 कोटी रुपये या  प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गंत सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 40 टक्के  (केंद्र हिस्सा 24 टक्के व राज्य हिस्सा 16 टक्के) व अनुसुचित जाती, जमाती, महिला या प्रवर्गासाठी प्रकल्प किंमतीच्या 60 टक्के (केंद्र हिस्सा 36 टक्के व राज्य हिस्सा 24 टक्के) या सुत्राप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्याची तरतूद आहे. प्रकल्प किंमतीच्या अर्थसहाय्याव्यतिरिक्त उर्वरित रक्‍कम ही लाभार्थी हिस्सा असेल.

            या  योजनेअंतर्गंत लाभार्थीभिमूख भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय विकासासाठी नवीन तळी, तलावांचे बांधकाम, अस्तित्वातील तळी, तलावांचे नुतनीकरण, मत्स्य, कोळंबी संवर्धनासाठी निविष्ठा वापरावर अनुदान, भारतीय प्रमूख कार्य व इतर संवर्धनायोग्य माशांच्या बीज उत्पादनासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करणे, मासळी वाहतुकीच्या पायाभूत सुविधेसाठी अर्थसहाय्य, शोभिवंत मासे संवर्धन व विक्री, मच्छिमारांना विमाछत्र, प्रशिक्षण कार्यक्रम, बर्फ कारखाना, शितरोधक वाहने, पुनर्चक्रीय पध्दतीने मत्स्यसंवर्धन  आणि जैवपूंज पध्दतीने मत्स्यसंवर्धन इत्यादी प्रकारच्या योजनांचा  समावेश आहे.

    सर्व मच्छिमार सहकारी संस्था, सभासद, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेची अधिक माहिती http://dof.gov.in/pmmsy या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

         तसेच उस्मानाबाद ‍जिल्ह्यात प्रस्तूत योजनेअंतर्गंत प्रस्ताव सादर करण्यास इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, उस्मानाबाद (प्रशासकीय इमारत पहिला मजला, उस्मानाबाद दूरध्वनी  क्रमांक-0247‍2-223364) येथे कार्यालयीन  वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, उस्मानाबाद यांनी केले आहे.