अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचा महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे.
*या संकल्पित वस्तुसंग्रहालयामध्ये खालील बाबींचा समावेश करणे अभिप्रेत आहे :*
• महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे कालखंड अधोरेखित करणे
• अश्मयुगीन,प्रागैतिहासिक काळ,ऐतिहासिक व मध्ययुगीन काळ,मराठा व ब्रिटिश कालखंड,
• महाराष्ट्रातील लोकजीवन व आदिवासी संस्कृती,
• स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, आधुनिक महाराष्ट्र .
वरील बाबी ऐतिहासिक कालपटातून प्रदर्शित करीत असताना संबंधित कालखंडाची समग्र मांडणी तत्कालीन समाज व लोकजीवन , स्थापत्य व संस्कृती अनुसार प्रदर्शित पुरावशेष , कलाकृती , त्रिमितीय प्रतिमा , दृकश्राव्य संकल्पना , त्रिमिती चित्रात्मक प्रतिकृती , वैकल्पिक वास्तव , आभासी वास्तव या माध्यमातून दर्शविणे संकल्पित आहे . तसेच वस्तुसंग्रहालयामध्ये उपहारगृह ,अद्ययावत सुविधांनी सज्ज सभागृह , संवर्धन प्रयोगशाळा , परिषद केंद्र इ . सुविधा उपलब्ध करुन देणेही संकल्पित आहे.
संकल्पित राज्य वस्तुसंग्रहालयाकरीता आवश्यक असणारे पुरावशेष व कलाकृती संचालनालयाच्या संग्रहातून , भारतीय पुरातत्व सर्वेक्षण व इतर संबंधित संस्थामधून विहित प्रक्रियेद्वारे संपादीत केल्या जातील .
वस्तुसंग्रहालयाकरीता पुरावशेष व कलाकृती यांची निवड व प्रदर्शन संकल्पना ( क्युरेटिंग ) व पुरावशेष व कलाकृती यांची शास्त्रशुद्ध मांडणी करणे आवश्यक आहे. ही कलाकृती व पुराणवस्तु कोणत्या असतील व कशा संपादित केल्या जातील याबाबत धोरणनिश्चिती आवश्यक आहे. या प्रयोजनार्थ वैश्विक निविदा पध्दतीने जागतिक दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा अनुभव असलेल्या जगातील नामांकित वास्तुविशारद संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित केले जातील .
या वैश्विक निविदेचे प्रारुप कसे असेल याबाबत तज्ञांची मुद्देनिहाय शिफारस आवश्यक ठरणार आहे .
याकरिता संकल्पित राज्य वस्तुसंग्रहालय निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा अभ्यास करुन या संदर्भात शासनास शिफारसी सादर करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.28 एप्रिल 2021 च्या या शासन निर्णयान्वये विविध क्षेत्रातील एकूण 22 तज्ञांची " राज्य वस्तुसंग्रहालय सल्लागार समिती " गठीत करण्यात आली आहे.
*"राज्य वस्तुसंग्रहालय सल्लागार समिती " सदस्यांची नावे :-*
1) श्री.सब्यसाची मुखर्जी, महानिर्देशक, छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख मार्गदर्शक वस्तुसंग्रहालय, मुंबई, हे या समितीचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. तर या समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे-
2) डॉ.अरविंद जामखेडकर, अध्यक्ष , भारतीय इतिहास अनुसंधान सदस्य समिती , नवी दिल्ली
3) प्रा.वसंत शिंदे, महानिदेशक, राष्ट्रीय सामुद्रिक वस्तुसंग्रहालय, लोथल, गुजरात
4) डॉ.नंदिनी भट्टाचार्य, क्षेत्रीय संचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई
5) श्री.शिवप्रसाद खेनेद, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई
6) श्री.अंजनीकुमार सिंग,नोडल ऑफिसर, बिहार वस्तुसंग्रहालय, पटना, बिहार
7) कमोडोर ओडक्कल जॉन्सन, अभिरक्षक, मेरीटाईम हिस्ट्री सोसायटी, मुंबई
8) संचालक, नॅशनल फिल्म आर्काईव्हज ऑफ इंडिया, पुणे
9) संचालक, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट, मुंबई
10) श्री.अमितेश्वर झा, संचालक, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन सदस्य न्युमिस्टॅटिक्स स्टडीज, अंजनेरी, नाशिक
11) श्री.के.सी.पांडे, संचालक, गारगोटी मिनरल वस्तुसंग्रहालय,सिन्नर, नाशिक
12) डॉ.पांडुरंग साबळे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, डेक्कन कॉलेज, पुणे ( भूगर्भशास्त्र तज्ञ )
13) डॉ.मंजिरी कामत,प्राध्यापिका, इतिहास विभाग , मुंबई विद्यापीठ, मुंबई (मुंबईच्या उद्योगांचे इतिहास तज्ञ )
14) डॉ.निलांबरी जगताप, समन्वयक, मराठा इतिहास अध्ययन केंद्र , शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
15) डॉ.राजेश रगडे, विभाग प्रमुख, पर्यटन विभाग, डॉ.बाबासाहेब सदस्य आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद
16) श्रीमती प्रिती त्रिवेदी, विभाग प्रमुख, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
17) डॉ.अपर्णा वाटवे,पुणे ( जैवविविधता तज्ञ )
18) प्रा.नीलकंठ छाया, वास्तुविशारद व शिक्षणतज्ञ
19) डॉ.कुरुष दलाल, इतिहास, मानववंश शास्त्र (पाककृती) तज्ञ, मुंबई
20) श्री.राहुल कादरी, वास्तुविशारद , मुंबई
21) श्रीमती बतुल राज मेहता, वस्तुसंग्रहालय नियोजक,मुंबई
22) या समितीचे संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
*या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील:-*
• नियोजित राज्य वस्तुसंग्रहालयाचे स्वरुप कसे असेल याबाबत संकल्पना निर्मिती करणे
• वस्तुसंग्रहालयाची स्थळ निश्चिती व क्षेत्रफळाची शिफारस करणे ( Location & Area )
• वस्तुसंग्रहालय उभारण्याची कार्यपद्धती / टप्पे निश्चित करणे ( Phasing )
• वस्तुसंग्रहालयाकरीता पुरावशेष व कलाकृती संपादन करण्यासंदर्भात शासनास शिफारस करणे व याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणे
• वस्तुसंग्रहालयातील मांडणी कशी असावी व त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश कशा पद्धतीने करावा याबाबत शिफारसी करणे
• वस्तुसंग्रहालयाचा प्रशासकीय आकृतीबंध तयार करणे
• वस्तुसंग्रहालय स्थापना व संचालन या दोन्हीकरीता वित्तीय नियोजन कसे असावे याबाबत शिफारस करणे
• दिव्यांगजनांसाठी हे संग्रहालय कसे आदर्शवत ठरेल याबाबत शिफारसी करणे
• वस्तुसंग्रहालयाची वास्तु कशा पद्धतीची असावी , सौर उर्जा व जलसंवर्धन या दृष्टीकोनातून शिफारस करणे
• वस्तुसंग्रहालय विविध संस्थांशी जोडले जाऊन हे शालेय व महाविद्यालयीन पाठ्यक्रमातील शैक्षणिक सहलींचा एक भाग बनेल , यादृष्टीने आवश्यक शिफारसी करणे
• वस्तुसंग्रहालय स्थापनेकरीता भागधारक ( Stake holder ) यांच्याकडून वस्तुसंग्रहालय स्थापनेकरीता सूचना व अभिप्राय आमंत्रित करणे व त्यांचा प्रकल्पात समावेश करणे
या समितीचा कार्यकाळ तीन महिने इतका राहणार असून या समितीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या दि.28 एप्रिल 2021 च्या या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील तीन महिन्यात आपला अहवाल शासनास सादर करणे आवश्यक राहणार आहे.
या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी अश्मयुगापासून ते आधुनिक काळापर्यंतचा महाराष्ट्र राज्याचा वैभवशाली प्रवास दाखवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस निश्चित पूर्ण होईल, यात शंकाच नाही.
मनोज शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग